Wednesday, 22 December 2010

मी भारतीय आहे

एक दिवस ऑफिसमधून घरी येत होते. ऑफिस सुटायची वेळ असल्याने नेहमीप्रमाणे ट्रेनमध्ये गर्दी होती. पण नशीब चांगल म्हणून निदान बसायला तरी जागा मिळाली.


मी जागा पटकावून जरा स्थिरस्थावर झाले. सहज समोरच्या सीटवर बसलेल्या एका महिलेकडे लक्ष गेल. तर ती मलाच निरखून पाहत होती. मला जरा विचित्रच वाटल पण काहीतरी प्रतिक्रिया द्यायची म्हणून मी तिच्याकडे पाहून स्मितहास्य केल. तीही माझ्याकडे पाहून हसली. लगेच तिने प्रश्न विचारला "Speak English or Netherlands?".. मी म्हणाले इंग्लिश. इथे बेल्जियम मध्ये फ्रेंच आणि डच या दोन भाषा बोलल्या जातात. आणि इथल्या लोकांचा कल हा शक्यतो इंग्लिश चा वापर न करणे यावरच असतो. तुम्ही कुठेही जा, सर्व सूचना,वेगवेगळे बोर्डस सर्व काही इथल्या भाषेतच असतात.

माझ उत्तर ऐकून त्या बाईने पुढच संभाषण सुरु केल. "तुम्ही इथल्या दिसत नाही. " "मी भारतीय आहे." मी उत्तर दिले. "Oh! really. Your eyes are very beautiful and you have got a very beautiful smile too.". तिच्या ह्या प्रतिक्रियेने अंगावरून क्षणभर मोरपीस फिरल्यासारख वाटल.

मी तिला thanx म्हटलं. "मला वाटलच तू भारतीय असशील.कारण मला वाटत फक्त भारतीय स्त्रियांचेच डोळे इतके सुंदर असतात." मी काहीही न बोलता तिच बोलण ऐकत होते.

ती बराच वेळ माझ्याशी बोलत होती. भारत कसा आहे? तिथले लोक कसे आहेत? इथे आणि तिथे काय फरक आहे?
असे अनेक प्रश्न तिने विचारले. 
 
ती म्हणाली तिलाही एकदा भारतात जायचय आणि तिथल वेगळेपण पहायचय. ती सांगत होती, तिची एक मैत्रीण आहे आणि ती 2 वर्षे भारतात राहून आली आहे.तिच्याकडूनही तिने बरच ऐकलं होत. आमच्या बोलण्याच्या नादात तीच स्टेशन कधी आल कळलंच नाही. माझा निरोप घेवून आणि पुढच्या आयुष्यासाठी शुभेच्छा देवून ती बाई निघून गेली.


ती गेल्यावर मी विचार करत राहिले. आज आपल्या देशात कितीही समस्या असोत, कितीही घोटाळे होत असोत, भ्रष्टाचार ,गरिबी यांना ऊत आला असेल, तरीही आपल्याला अभिमान वाटाव्या अशा बऱ्याच गोष्टीही ह्याच देशात आहेत. आणि ह्याची प्रचीती देशाच्या बाहेर गेलेल्या माझ्यासारख्या प्रत्येक भारतीयाला येत असेल ह्याची मला खात्री आहे.


माई

आपल्या आजूबाजूच्या समस्या पाहिल्या की आपण किती कळवळून बोलतो, माझ्याकडे थोडे जास्त पैसे असते तर मी नक्की काहीतरी केले असते..किवा मी माझ्या सर्व जबाबदारयातून मोकळा/मोकळी झालो/झाले की ह्या समाजासाठी नक्की काहीतरी करेन. मला वाटत आपल्यापैकी बऱ्याच जणांना माझं हे म्हणन पटेल कारण मी ही हे वाक्य बऱ्याच वेळा बोलले आहे.

हे सार इथे सांगण्याचं कारण हेच, की जी मानसं अशा कामासाठी स्वतःच आयुष्य वेचतात ते आपल्यासारखे महिन्याला काही dollars किवा Euros कमावणारे नसतात पण तरीही आपल्यापेक्षा खूप वेगळा विचार करतात.

मी बोलतेय ते महाराष्ट्रातील एका थोर महिलेबद्दल. ज्यांना संपूर्ण महाराष्ट्र माई म्हणून ओळखतो त्या सौ. सिंधुताई सपकाळ.
झी मराठीवर त्यांची मुलाखत पाहिली आणि मग त्यांच्या कर्तृत्वाबद्दल लिहिण्याचा मोह आवरता आला नाही.
 नुकताच त्यांच्या जीवनावर आधारित एक चित्रपटही प्रदर्शित झाला आहे.

मुलाखतीच्या सुरुवातीलाच माईंनी एक छान विचार बोलून दाखवला.
"देवा आम्हाला हसायला शिकव पण आम्ही कधी रडलो होतो ह्याचा विसर पडू देवू नकोस."

विदर्भातील एका छोट्याश्या खेड्यात माईंचा जन्म झाला. त्यांचं खर नाव होत "चिंधी". एक नको असलेल मूल म्हणूनच बहुतेक अस नाव आई वडिलांनी ठेवलं असाव. त्यांना लहानपणापासूनच शिक्षणाची खूप आवड होती. घरच्या कामातून वेळ मिळेल तशा त्या शाळेत जायच्या. अतिशय गरीब परिस्थितीत त्यांचं बालपण गेला. वयाच्या अवघ्या ९ व्या वर्षी त्यांचं लग्न त्यांच्यापेक्षा वयाने बऱ्याच मोठ्या असणाऱ्या श्रीहरी सकपाळ यांच्याशी झालं. लग्न झालं तरी त्यांची शिक्षणाची,वाचनाची आवड काही कमी झाली नाही. वाणसामान खरेदी करताना त्याला गुंडाळून आलेले वर्तमानपत्र हेच त्यांच्या वाचनाचे साधन बनले. पण सासू आणि नवरा ह्या दोघानाही त्यांची ही सवय आवडत नव्हती.


एका कसल्याशा संशयावरून वयाच्या २० व्या वर्षी माईना  नवऱ्याने घराबाहेर काढले, त्यावेळी त्यांच्या पदरात नुकतीच जन्मलेली त्यांची मुलगी होती.

त्यावेळी त्यांनी स्मशानामध्ये रात्र काढली...का तर त्याच्या एवढी सुरक्षित जागा दुसरी नवतीच. मानसं एक तर मेल्यावर स्मशानात जातात आणि जिवंत मानसं भुतांच्या भीतीने स्मशानात जात नाहीत.

मुलीला घेवून त्या वणवण फिरल्या. स्वताच नको असलेल नाव बदलून त्यांनी सिंधू अस ठेवलं. आपल्या एका लेकीला वाढवता वाढवता समाजातील इतरही लेकरांची माय होवून त्यानाही पाहू लागल्या.

त्यांची एक गोष्ट एकदमच भारावून टाकणारी आहे. ती म्हणजे, त्यांची स्वतःची मुलगी त्यांनी दगडूशेठ हलवाई Trustla देवू केली. कारण काय तर स्वतःची मुलगी आणि इतर अनाथ मुल ह्यांच्यात आई म्हणून फरक होवू नये.

आज माईंची १०४२ मुल आहेत. त्यातील कोणी वकील कोणी डॉक्टर झालाय तर एकजण खुद्द मायीन्च्याच जीवनावर PhD करतोय. त्यांची मुलगी स्वतःच एक वेगळं अनाथालय चालवते.

त्यांना आतापर्यंत २७२ वेगवेगळे पुरस्कार मिळाले आहेत. आपल्या पुरस्कारातील रकमेतून मुलांसाठी जागा घेवून त्यांच्यासाठी एक घर माईंनी मिळवून दिलंय. आणि अजूनही सतत आपल्या मुलांसाठी जास्तीत जास्त मदत मिळवण्यासाठी त्या झटत असतात. विश्व मराठी संमेलनाच्या निमित्ताने त्यांची अमेरिकावारीही झाली आहे.


अलीकडेच प्रदर्शित झालेला "मी सिंधुताई सकपाळ" हा त्यांच्या जीवनावर रचित चित्रपट त्यांची संपूर्ण जीवनयात्रा मांडतो. त्यांची जीवनकहाणी समजून घेण्यासाठी हा चित्रपट नक्कीच पाहिला पाहिजे.

त्यांच्या चित्रपटात जे म्हटलंय ते माईंच्या बाबतीत अगदी खर आहे....."देवाला प्रत्येक ठिकाणी जाता येत नाही, म्हणून त्याने आईची निर्मिती केली.."
सौजन्य: विकिपीडिया , झी मराठी.

Monday, 20 December 2010

एक छानस वाक्य

देवा आम्हाला हसायला शिकव पण आम्ही कधी रडलो होतो ह्याचा विसर पडू देवू नकोस.....

Saturday, 18 December 2010

नव्याने सुरुवात

खुप उत्साहात हा ब्लॉग सुरु केला खरा...पण नेहमीचा आळस आड़ आला॰ पण सध्या इथे भरपूर रिकामा वेळ असल्याने आणि इन्टरनेट व्यतिरिक्त दुसरे कसलेही मनोरंजनाचे साधन नसल्याने म्हणा, ब्लॉग वर नियमित लिहिता येईल असे वाटते....

ह्या सुरुवातीसाठी माझ्या मलाच खुप खुप शुभेच्छा....:)

Tuesday, 27 January 2009

Judging the cover of the book

नेहमीप्रमाणे आजही बसमध्ये भरपूर गर्दी होती आणि मनातल्या मनात माझी चरफ़ड चालली होती.
एक दिवस बसायला जागा मिळेल तर...पण नाही.
मी उभी होते आणि नेहमीप्रमाणे गर्दीच निरीक्षण चालल होत.
माझ्या बाजुच्या सीटवर उजवीकडे एक तीशीचा तरुण बसला होता आणि हातात असणाऱ्या वहीतील
स्केचेस पहात होता. माझ्या उजव्या हातात ऑफ़ीसची बॅग होती. काही वेळाने त्या तरुणाने माझ्या बॅगेकडे हात दाखवुन काही तरी सान्गायचा प्रयत्न केला.माझ्या बॅगेचा त्याला त्रास होतोय अस मला वाटल."आता काय डोक्यावर घेउ बॅग?", मी मनात म्हटल.बर दुसऱ्या हातात घ्यावी तर उतरणाऱ्या प्रवशान्ना त्रास.मी न पाहील्यासारखे करुन तशीच उभी राहिले.परत थोड्या वेळाने याची बॅगेबद्दलची खुणवाखुणवी सुरु झाली.मी विचार केला,"काय लोक असतात,प्रत्येकजण आपापली सोय पहातो.जरा दुसऱ्याची अडचण समजुन घेतली तर काय होईल?". मी रागानेच बॅग एका हातातुन दुसऱ्या हातात घेतली.तेवढ्यात तो तरुण म्हणाला,"मॅडम, तुमचा मोबाईल वाजतोय केव्हाचा .फोन आलाय वाटत कोणाचा तरी."
त्याचे शब्द ऐकले आणि मला उगीचच अपराध्यासारख वाटू लागल.
किती पटकन आपण एखाद्याबद्दल एखाद मत बनवतो नाही.ह्या सर्व प्रसन्गावरुन फार पूर्वी वाचलेल एक वाक्य आठवल."Don't judge just the cover of the book..."

Saturday, 24 January 2009

प्रेमाचा गुलकन्द-प्र.के.अत्रे

आज बऱ्याच दिवसानी ही कविता वाचली आणि इथे पोस्ट करण्याचा मोह आवरला नाही.

प्रेमाचा गुलकन्द

बागेतुनि वा बाजारातुनि कुठुन तरी ’त्या’ ने
गुलाबपुष्पे आणुनि द्यावीत ’तिज’ला नियमाने

कशास सान्गु प्रेम तयाचे तिजवरती होते?
तुम्हीच उकला बिन्ग यातले काय असावे ते!

गुलाब कसले?प्रेमपत्रिका लालगुलाबी त्या!
लाल अक्षरे जणू लिहिलेल्या पाठपोट नुसत्या!

प्रेमदेवता प्रसन्न होई या नैवेद्याने!
प्रेमाचे हे मार्ग गुलाबी जाणति नवतरणे!

कधी न त्याचा ती अवमानी फुलता नजराणा!
परि न सोडला तिने आपुला कधिही मुग्धपणा!

या मौनातच त्यास वाटले अर्थ असे खोल!
तोहि कशाला प्रगट करी मग मनातले बोल!

अशा तर्हेने मास लोटले पुरेपूर सात,
खन्ड न पडला कधी तयाच्या नाजुक रतिबात!

अखेर थकला!ढळली त्याची प्रेमतपश्चर्या,
रन्ग दिसेना खुलावयाचा तिची शान्त चर्या!

धडा मनाचा करुनि शेवटी म्हणे तिला,"देवी!
(दुजी आणखी विशेषणे तो गोन्डस तिज लावी)

"बान्धित आलो पूजा मी तुज आजवरी रोज!
तरि न उमगशी अजुनि कसे तू भक्तान्चे काज?

गेन्द गुलाबी मुसमुसणारे तुला अर्पिलेले
सान्ग अरी सुन्दरी,फुकट का ते सगळे गेले?"

तोच ओरडुनि त्यास म्हणे ती,"आळ व्रुथा हा की!
एकही न पाकळी दवडली तुम्ही दिल्यापैकी!"

असे बोलुनी त्याच पावली आत जाय रमणी
क्षणात घेउनि ये बाहेरी कसलीशी बरणी!

म्हणे,"पहा मी यात टाकले ते तुमचे गेन्द,
आणि बनविला तुमच्यासाठी इतुका गुलकन्द!

कशास डोळे असे फिरविता का आली भोन्ड?
बोट यतले जरा चाखुनी गोड करा तोन्ड!"

क्षणौक दिसले तारान्गण त्या,-वरी शान्त झा्ला!
तसाच बरणी आणि घेउनी खन्द्यावरि आला!

"प्रेमापायी भरला" बोले, "भुर्दन्ड न थोडा!
प्रेमलाभ नच!गुलकन्द तरी कशास हा दवडा?"

याच औषधावरी पुढे तो कसातरी जगला,
ह्रुदय थाम्बुनी कधीच नातरि तो असता खपला!

तोन्ड आम्बले असेल ज्या्चे प्रेमनिराशेने
’प्रेमाचा गुलकन्द’ तयानी चाटुनि हा बघणे!

कवितासन्ग्रह: झेन्डूची फुले

Friday, 23 January 2009

ट्रिपल फ़िल्टर टेस्ट

ट्रिपल फ़िल्टर टेस्ट
"मैत्री", जगातल सर्वात सुन्दर अस नात.याच मैत्रीबद्दलची ही एक कथा.
प्रसिद्ध तत्त्ववेत्ता सॉक्रेटिसकडे एकदा एक जण आला आणि त्याला सान्गु लागला, "तुम्हाला माहीत आहे का तुमच्या जिगरी दोस्ताबद्दल आज मी काय ऐकलय ते?","एक मिनिट थाम्ब",सॉक्रेटिस म्हणाला,"तू जे काही मला सान्गणार आहेस त्यापुर्वी मी एक छोटिशी टेस्ट घेउ इच्छीतो.ट्रिपल फ़िल्टर टेस्ट. माझ्या मित्राबद्दल आणि तेही मला माहीत नसलेली अशी गोष्ट तू सान्गतो आहेस.तुझा हेतु कदाचित चान्गलाही असेल,पण ते शब्द आपण अगोदर गाळुन घेउ,म्हणजे चान्गल तेवढच आपल्या पदरात पडेल.पहिल्या चाचणीच नाव ’सत्य’", सॉक्रेटिसने त्या ग्रहस्थाला विचारल "तू जे काही मला सान्गणार आहेस ते सत्य आहे याची शम्भर टक्के खात्री तुला आहे का?","नाही,खर तर माझ्या फ़क्त ते कानावर आलय आणि..","ठीक आहे,म्हणजे तु जे काही सान्गतोयस ते केवळ ऐकीव आहे आणि त्यातली सत्यता तुला ठाऊक नाही.आता आपण दुसरी चाचणी घेउ.या चाचणीच नाव आहे ’चान्गुलपणा’.माझ्या मित्राबद्दल जी गोष्ट तू सान्गणार आहेस ती चान्गली आहे का?", सॉक्रेटिसन विचारल."नाही.उलट मी तर..".त्या ग्रहस्थाचे पुढचे शब्द तोन्डातच अडकले."पुढे जायच की नाही हे ठरवण्यासाठी आपल्याकडे आणखी एक चाचणी आहे,’उपयोगिता’.मला सान्ग, माझ्या मित्राविषयी तू जे काही सान्गु पहातोय त्याचा मला काही उपयोग होणार आहे का?", सॉक्रेटिसन त्याला विचारल."नाही.खात्रीन नाही",तत्परतेन तो म्हणाला."दोस्ता,माझ्या मित्राबद्दल तू जे काही सान्गणार आहेस त्याच्या सत्यतेबद्दल तु्ला स्वतालाच खात्री नाही,ते चान्गल तर नाहीच आणि काही उपयोगाचही नाही, मग तू ते मला कशासाठी सान्गतो आहेस? क्रुपा करुन तुझी ही कहाणी तुझ्याकडेच ठेव."

माझ्या मते फ़क्त मैत्रीतच नव्हे तर प्रत्येक नात्यात आपण ही टेस्ट वापरली तर...