Wednesday, 22 December 2010

मी भारतीय आहे

एक दिवस ऑफिसमधून घरी येत होते. ऑफिस सुटायची वेळ असल्याने नेहमीप्रमाणे ट्रेनमध्ये गर्दी होती. पण नशीब चांगल म्हणून निदान बसायला तरी जागा मिळाली.


मी जागा पटकावून जरा स्थिरस्थावर झाले. सहज समोरच्या सीटवर बसलेल्या एका महिलेकडे लक्ष गेल. तर ती मलाच निरखून पाहत होती. मला जरा विचित्रच वाटल पण काहीतरी प्रतिक्रिया द्यायची म्हणून मी तिच्याकडे पाहून स्मितहास्य केल. तीही माझ्याकडे पाहून हसली. लगेच तिने प्रश्न विचारला "Speak English or Netherlands?".. मी म्हणाले इंग्लिश. इथे बेल्जियम मध्ये फ्रेंच आणि डच या दोन भाषा बोलल्या जातात. आणि इथल्या लोकांचा कल हा शक्यतो इंग्लिश चा वापर न करणे यावरच असतो. तुम्ही कुठेही जा, सर्व सूचना,वेगवेगळे बोर्डस सर्व काही इथल्या भाषेतच असतात.

माझ उत्तर ऐकून त्या बाईने पुढच संभाषण सुरु केल. "तुम्ही इथल्या दिसत नाही. " "मी भारतीय आहे." मी उत्तर दिले. "Oh! really. Your eyes are very beautiful and you have got a very beautiful smile too.". तिच्या ह्या प्रतिक्रियेने अंगावरून क्षणभर मोरपीस फिरल्यासारख वाटल.

मी तिला thanx म्हटलं. "मला वाटलच तू भारतीय असशील.कारण मला वाटत फक्त भारतीय स्त्रियांचेच डोळे इतके सुंदर असतात." मी काहीही न बोलता तिच बोलण ऐकत होते.

ती बराच वेळ माझ्याशी बोलत होती. भारत कसा आहे? तिथले लोक कसे आहेत? इथे आणि तिथे काय फरक आहे?
असे अनेक प्रश्न तिने विचारले. 
 
ती म्हणाली तिलाही एकदा भारतात जायचय आणि तिथल वेगळेपण पहायचय. ती सांगत होती, तिची एक मैत्रीण आहे आणि ती 2 वर्षे भारतात राहून आली आहे.तिच्याकडूनही तिने बरच ऐकलं होत. आमच्या बोलण्याच्या नादात तीच स्टेशन कधी आल कळलंच नाही. माझा निरोप घेवून आणि पुढच्या आयुष्यासाठी शुभेच्छा देवून ती बाई निघून गेली.


ती गेल्यावर मी विचार करत राहिले. आज आपल्या देशात कितीही समस्या असोत, कितीही घोटाळे होत असोत, भ्रष्टाचार ,गरिबी यांना ऊत आला असेल, तरीही आपल्याला अभिमान वाटाव्या अशा बऱ्याच गोष्टीही ह्याच देशात आहेत. आणि ह्याची प्रचीती देशाच्या बाहेर गेलेल्या माझ्यासारख्या प्रत्येक भारतीयाला येत असेल ह्याची मला खात्री आहे.


No comments: